‘ध्यानधारणा’ नव्हे तर फक्त ‘प्रसिध्दीकामना’, असा एकही अँगल नाही जिथून मोदींनी फोटो काढला नाही!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले. येथे ध्यानधारणा करतानाचे मोदी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरून आता विरोधकांना त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ध्यानधारणा ही कायम एकांतात केली जाते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक कॅमेरे घेऊन कन्याकुमारीला पोहोचले. त्यांचे वेगवेगळ्या अँगलने फोटोही काढण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला असून ‘मोदींनी कन्याकुमारीला जाऊन ‘ध्यानधारणा’ नव्हे तर फक्त ‘प्रसिध्दीकामना’ केली हे मात्र नक्की’, असा टोला लगावला.

हे वाचा – तू खींच मेरी फोटो! कन्याकुमारीत ध्यानधारणेदरम्यान पंतप्रधान मोदींचं फोटोशूट

“मोदींनी कन्याकुमारीला जाऊन ‘ध्यानधारणा’ नव्हे तर फक्त ‘प्रसिध्दीकामना’ केली हे मात्र नक्की! ध्यानधारणेच्या नावाखाली स्वतःची प्रसिध्दी साधून जनमत आकर्षित करण्याचा प्लॅन पुरता फसला आहे. कारण जनता या ढोंगीपणाला आता चांगलीच ओळखून आहे”, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केले आहे.

तर अन्य एका ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते की, “जनतेच्या कष्टाच्या कररूपी पैशातून स्वतःची पर्यटन प्रसिद्धी साधून जनतेचं पर्यटन मात्र बंद करणारे मोदी हे देशाच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरलेत. जे पंतप्रधान स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या हक्कावर बंधनं घालू शकतात ते लोकशाहीलाही नक्कीच उध्वस्त करू शकतात यात मुळीच शंका नाही.”

आणखी एका ट्विटमध्ये राष्ट्रवादीने म्हटले की, “कन्याकुमारीत मेडिटेशनच्या नावाखाली अनेक फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर मोदीजी सोबत घेऊन गेलेत. परंतु मोदीजी इतक्या वेगवेगळ्या अँगलने फोटो काढून घेत आहेत की, ते पाहून फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफरच्या कसरतींची दया येईल.”