धनदांडग्यांना सवलती, सामन्यांची निराशा; अर्थसंकल्पावर रोहित पाटील यांची टीका

कुठल्याच विभागाला पुरेसा असा निधी देण्यात आला नाही. आजचं जर अर्थसंकल्प पाहिलं तर धनदांडग्यांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात फक्त निराशा आम्हाला दिसत आहे. विरोधक आणि राज्यातील नागरिक म्हणून आम्ही सगळे या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध करतो, अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले.

‘लाडक्या बहिणींची फसवणूक’

लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका करत रोहित पाटील म्हणाले की, “निवडणुकीत हे सांगत होते की, आम्हाला निवडून दिलं तर, 1500 चे 2100 करू, अन्यथा हे 1500 देखील बंद होतील, अशा प्रकारची फसवणूक या सरकारने निवडणुकीच्या काळात केली. आता हे लोक येऊन म्हणत आहेत की, आम्ही 2100 ची घोषणाच केली नव्हती. 1500 आम्ही कागदावर लिहिलं होतं, असं छातीठोकपणे यांचे आमदार सांगतात. एकूण या अर्थसंकल्पाला अर्थसंकल्पीय भाषण असं न म्हणता, मी फसवणुकीचे भाषण असं म्हणेल.”