
‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही,’ असे विधान करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बाहेर बोलायचीही चोरी झाली आहे.’
‘शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱया शेतकऱयांसमोर मी बोलत होतो. राजू शेट्टी यांनी हे आंदोलन हातात घेतलं आहे, त्यामुळे काही काळजीचं कारण नाही, असे मी सांगत होतो. माजी खासदार राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही. आम्ही त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून उभे राहायला सांगत होतो; पण त्यांनी माझं ऐकलं नाही, त्यामुळे ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. तुम्ही तुमचं आंदोलन कायम सुरू ठेवा. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,’ अशी त्यामागील माझी भावना होती,’ असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील म्हणाले, ‘त्या वाक्यावरून मी नाराज आहे, इथपासून पक्ष बदलण्यापर्यंत माझी गाडी गेली. त्याचं स्पष्टीकरण मी खरं तर त्याच वेळी तासाभरानंतर विधान भवनात आल्यानंतर तातडीने दिलं होतं. तेच स्पष्टीकरण आज इथे बारामतीतही देत आहे. त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतं की, काही केलं तरी मला ढकलायचं कुठेतरी!’
वैयक्तिक वैर न घेणे हे मी शरद पवारांकडून शिकलो
‘जयंत पाटील हे सर्वांना हवेहवेसे वाटतात,’ या सुप्रिया सुळे यांच्या विधानावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘माझे सर्वच पक्षांतील लोकांशी चांगले संबंध आहेत. त्या भावनेतून त्या बोलल्या आहेत. राजकारणात सर्वांशी चांगले संबंध ठेवणे, वैयक्तिक वैर न घेणे हे मी शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे. त्यामुळे त्या म्हणतात ते योग्यच आहे,’ असा दावाही जयंत पाटील यांनी केला.