महाविकास आघाडीचेच काम करीत राहणार, गोकुळ झिरवाळ यांची ग्वाही; अजित पवार गटाचे धाबे दणाणले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श ठेवूनच आमच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. यापुढेही महाविकास आघाडीचेच काम करणार, अशी ग्वाही दिंडोरीचे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी दिली. यामुळे अजित पवार गटाचे धाबे दणाणले आहे.

नाशिक येथे मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे या मेळाव्याला हजर होते. यावेळी ते म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांचेच काम केले. यापुढेही महाविकास आघाडीचेच काम करणार. कुटुंब आणि राजकीय व्यवस्था वेगळी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

…तर वडिलांविरुद्ध लढू

मी आणि माझ्या वडिलांची छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील, असे विधान गोकुळ झिरवळ यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर दिंडोरीतून वडिलांविरुद्ध लढू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.