नागपूर मेट्रो प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारावरून कॅगने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. त्या मुद्दय़ावरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील नागपूर मेट्रोच्या मुद्दय़ावरून सत्ताधाऱयांवर तुटून पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात असताना हा भ्रष्टाचार झालाच कसा, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. पाटील यांचे ते वाक्य सत्ताधाऱयांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी थयथयाट करत माफीची मागणी केली.
जयंत पाटील म्हणाले की, ‘‘सरकारमध्ये भ्रष्टाचाराची कामे चालू आहेत. ऑडिटमध्ये काहीच येणार नाही अशा पद्धतीने प्रकल्प किंवा निविदा मॅनेज केल्या जातात. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पैशांचा महापूर पाहिला त्याचे उगमस्थान या भ्रष्टाचारात आहे आणि नगरविकास विभागात मोठय़ा प्रमाणात मेट्रोची निर्मिती होतेय ते याचे उदाहरण आहे. उपमुख्यमंत्री यांच्या नागपूर शहरातील मेट्रोबाबत पॅगचा अहवाल समोर आला असून पॅगने याप्रकरणी प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत,’’ असे जयंत पाटील यांनी सभागृहाला सांगितले.
z जयंत पाटील यांनी गडकरींचे नाव घेतल्याने भाजपचे आशीष शेलार यांनी आक्षेप घेतला. कोणावर आरोप करायचा असेल तर नोटीस द्यावी लागेल. ज्या दोन नेत्यांची नावे जयंत पाटील यांनी घेतली ते त्यांनी मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी रेकॉर्डवरून काढून टाकण्यासारखे वाईट मी काहीच बोललो नाही. माफी कोणाची आणि का मागायची? आम्ही त्यांच्या मेहेरबानीने निवडून येत नाही. त्यांनी कान उघडे ठेवत शांतपणे ऐकावे,’’ असे जयंत पाटील म्हणाले.