भाजपकडून आचारसंहितेची ऐशी की तैशी; राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांचा आरोप

जाफराबाद तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजुरीचे कोरे आदेश वाटण्याचे काम सुरू असून, जेवढे अर्ज आले तेवढे मंजूर दाखवले जात आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमिष दाखवण्याचे काम सुरू असून मंजुरी आदेशावर डिजिटल स्वाक्षरी करण्यात येत आहे. निराधार योजनेची यादी फायनल झाली असल्यास जाफराबाद तहसील कार्यालयात लावण्यात आलेली नसून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, असे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जाफराबाद तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना देखील संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव मंजूर असल्याचा बनाव करून मंजुरी आदेश वाटप करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी भाजपा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन या मंजुरी पत्रावर करण्यात आलेले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अधिकृत कार्यालय तहसील कार्यालयात असताना भाजप कार्यालयात कशासाठी बोलावले जात आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याजवळ संजय गांधी निराधार योजनेची एक्सल शिट यादी आहे. या यादीमध्ये प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर असा कोणताही शेरा नाही, फक्त ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांचे नाव टाकून मंजुरी आदेश असल्याचा बनाव करत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. निराधार योजनेची यादी मंजूर नसल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार सांगत आहेत.

मागील वेळी देखील जाफराबाद तहसील कार्यालयातून शेकडो निराधारांच्या प्रस्तावांना पाय फुटले होते. विशिष्ट जातीचे, समाजाचे प्रस्ताव गायब करण्यात आले होते. आम्ही याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर सदर प्रस्ताव पुन्हा तहसील कार्यालयात परत आले होते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्ताव मंजूर अगर नामंजुरीचा आदेश हा शासकीय असतो, मात्र आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्यासाठी सर्व खटाटोप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी लक्ष देऊन आदर्श आचारसंहितेचे पालन न करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी, व जनतेच्या डोळ्यात होत असलेली धूळफेक थांबवावी, अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली.