नागपूर पूर्वनियोजित कट होता तर मग तुम्ही काय हजामत करीत होतात? अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांनी सरकारला घेरले

राज्यात गुन्हेगारी, खंडणी, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. शांत नागपूरमध्ये दंगल उसळली. त्यानंतर नागपूरची दंगल पूर्वनियोजित कट होता असे गृह विभागाने सांगितले. हा पूर्वनियोजित कट होता तर मग तुम्ही काय हजामत करीत होतात, असा सणसणीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी आज विधानसभेत गृह विभागाला केला.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांनी राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारला चांगलेच घेरले. जयंत पाटील यांनी गृह विभागाच्या कारभाराचे अत्यंत कठोर शब्दात वाभाडे काढले. राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचा उल्लेख करीत ते म्हणाले की, दावोसला जाऊन तुम्ही 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली, पण त्याचे सामंजस्य करार अजून झालेले नाहीत. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहून ते गुंतवणूकदार दुसरे राज्य शोधतील.

गुन्हे कधी दाखल होणार? – जयंत पाटील

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल झाला, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत नाहीत. छत्रपती शिवराय व महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या सर्वांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.

झक मारलीऐवजी मासे मारले

प्रशांत कोरटकरला पोलिसांनी दिलेल्या पोलीस संरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरताना ‘झक मारली’ असा शब्दप्रयोग केला. पण त्यावर तालिका अध्यक्ष बबनराव लोणीकर हे जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले की, जयंतराव तुम्ही भाषण चांगले केले, पण तुमच्या भाषणात ‘झक मारली’असा उल्लेख केला आहे. तुमच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल होईल. त्यामुळे तुम्ही केलेला शब्दप्रयोग भाषणातून काढून टाकतो. त्यावर जयंत पाटील म्हणाले, बरं, मग ‘झक मारली’ शब्दप्रयोगाऐवजी ‘मासे मारले’ असा शब्दप्रयोग करा असे सांगताच सभागृहात एकच हशा उसळला. मात्र त्यानंतर त्यांच्या भाषणातील शब्दप्रयोग बदलण्यात आला.

दंगल पेटण्यास सरकारच जबाबदार – नाना पटोले

नागपूरच्या दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही, पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. मग पोलिसांनी ती चादर ताब्यात का घेतली नाही? ती चादर ताब्यात घेतली असती तर ही घटना झालीच नसती, असे सांगत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विधानसभेत केला.