सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, मुंबई पोलिसांच्या तपासावर सीबीआयचा शिक्कामोर्तब

बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 2020 मध्ये आत्महत्या केली. परंतु बिहारच्या निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी त्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याचा तपास मुंबई पोलिसांनी केला असता त्यात स्पष्टपणे समोर आले की, त्याने आत्महत्याच केली. नंतर हा तपास सीबीआयला देण्यात आला. सीबीआयचा क्लोझर रिपोर्ट आता समोर आला असून त्यांनीही सुशांत सिंहने आत्महत्या केल्याने म्हटले आहे. एक प्रकारे हा मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

सीबीआयने दिलेल्या क्लोझर रिपोर्टवर देशमुख म्हणाले, मी राज्याच्या गृहमंत्री असताना सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती, परंतु तेव्हाच्या विरोधकांनी आरोप केला होता की, राजपूत याची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलिसांनी सुरू केला. तपास सुरू असताना अनेक बाबी समोर आल्यानंतर वारंवार मी सांगत होतो की, सुशांत सिंह याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला रिपोर्ट सादर केला. त्यातसुद्धा सुशांत सिंह याची हत्या करण्यात आली नसून त्याने आत्महत्याच केल्याचे समोर आले होते.

तपास योग्यच

सुशांत सिंह याच्या वडिलांनी पाटणा येथे तक्रार देऊन सुशांत सिंह याची हत्या करण्यात आल्याची तसेच रिया चक्रवर्ती हिने 15 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला होता. यावरून या प्रकरणाचा तपास हा सीबीआयला देण्यात आला. आता सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आला असून यात सुशांत सिंह याची हत्या करण्यात आली नसून आत्महत्याच असल्याचे समोर आल्याने तेव्हाचा मुंबई पोलिसांनी केलेला तपास हा योग्य होता, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.