राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे – सुनंदा पवार

दिल्लीमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी दोन्ही गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतात. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, असे म्हटले आहे.

सुनंदा पवार म्हणाल्या, मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा. भीमथडी जत्रे संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेनंतर सुनंदा पवार पत्रकारांशी बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि काल दिल्लीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची भेट. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील पवार यांच्याशी झालेली भेट या सर्व पार्श्वभूमीवर विचारले असता सुनंदा पवार यांनी कालची भेट कौटुंबिक होती, असे सांगितले. शरद पवार 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व लोक आले होते. दरवर्षी आम्ही सर्व कुटुंबीय शरद पवार यांना भेटत असतो. आता कुटुंब म्हणून एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगितले.

अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. परंतु भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे, असे मला वाटते असेही त्यांनी सांगितले.