भाजप व त्यांच्या सहकाऱयांच्या हातात सत्ता आहे. आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली आहे. त्यातून जसं हिटलरच्या जर्मनीतील गोबेल्स नीतीची चर्चा होते, त्याचप्रमाणे असत्यावर आधारित अनेक गोष्टी जनमानसात पसरवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराचा समारोप आज झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. सध्या देशाचे चित्र भाजपला अनुकूल नाही. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये भाजप नाही. काही ठिकाणी भाजप आहे; पण स्वतःच्या ताकदीवर नाही. गोव्यात आमदार पह्डून तिथे भाजप सत्तेत आली. तीन राज्यांच्या निवडणुका होण्याआधी मध्य प्रदेशात आमदार पह्डून भाजपने सत्ता मिळविली. त्यामुळे भाजपला देशात अनुकूल वातावरण नाही. अनेक कार्यक्रम जाहीर केले, पण त्याची अंमलबजावणीच न करून लोकांची फसवणूक करण्याचे काम भाजपने केले आहे, असे शरद पवार यांनी सुनावले.
लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावर शरद पवार यांनी भूमिका मांडली. संसदेत काही लोक घुसले. ते काहीतरी मागणी करत होते. नंतर सभागृह बंद झाले. त्यावर आमच्या खासदारांनी पंतप्रधान पिंवा गृह मंत्र्यांनी संसदेत यासंदर्भात माहिती द्यावी, अशी मागणी केली. पण त्याला परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षांच्या अग्रही भूमिकेचा परिणाम 146 खासदारांच्या निलंबनात दिसून आला, असे पवार यांनी सांगितले.
शेतकरी अडचणीत; अर्थव्यवस्था गंभीर
देशाची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. अन्नदाता शेतकरी अनेक गोष्टींमुळे अडचणीत आहे. अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. साखर, कापूस, सोयाबीन, कांद्याला भाव कमी आहे. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क, साखरेच्या निर्यातीवर शुल्क लादले आहे, असे पवार यांनी सांगितले.
शेतकऱयांची कर्जमाफी करू – सुप्रिया सुळे
आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर सर्वप्रथम शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल. तसेच अंगणवाडी सेविकांचे प्रश्न तातडीने सोडवू, महिला सुरक्षा हा सर्वांत मोठा कार्यक्रम असेल, एस.टी. महामंडळाची एक वर्षात स्थिती सुधारू, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. लढायचे तर दिल्लीतील अदृश्य शक्तीविरोधात. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट जुमला पक्ष आहे. ही लढाई माझ्या वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
415 म्हणो की 500 म्हणो
पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात ‘मोदी की गॅरंटी’ आहे; पण ती काही खरी नाही. भाजपवाल्यांनी 415 म्हणो, 500 म्हणो; पण आज देशात भाजपला अनुकूल चित्र नाही, असे पवार म्हणाले.
मोदींची गॅरंटी खरी नाही
पंतप्रधान मोदी संसदेत क्वचितच येतात; पण जेव्हा येतात तेव्हा एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की संसदेतील सदस्यही काही वेळेसाठी थक्क होतात. मोदी घोषणा खूप करतात. 2016-17ला अर्थसंकल्प संसदेत मांडला तेव्हा त्यात सांगितले की, 2022पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. आता 2024 आले; पण काहीच घडले नाही. मोदींनी सांगितले होते 2022पर्यंत शहरी भागातील लोकांना पक्की घरे दिली जातील. पण ही घोषणा हवेतच राहिली. मोदी सांगतात गॅरंटी आहे. पण ती काही खरी नाही. याचा अनुभव अनेकदा आला आहे, असा टोला पवारांनी लगावला.