तेव्हा एकनाथ शिंदे ज्युनिअर होते! म्हणत छगन भुजबळांचा संजय राऊतांच्या विधानाला दुजोरा

राज्यात 2019 मधील विधानसभा निवडणुकांवेळी भाजपने दिलेला शब्द न पाळल्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, तसेच महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकनाथ शिंदे ज्युनिअर असल्याचे कारण देत त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केला होता, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर चर्चा सुरू झाल्या. त्याला आता अजित पवारांच्या गटातील नेते छगन भुजबळ यांनी दुजोरा दिला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेवेळी मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोकं होते, त्यावेळेस एकनाथराव ज्युनिअर होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नावाला विरोध केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. या वक्तव्यातून त्यांनी संजय राऊत यांच्या विधानावर शिक्कामोर्तब केल्यासारखंच आहे.

पवार काका पुतण्यांनी काय केलं, हे माहिती नाही. मात्र, शिंदे ज्युनि्र असल्याने त्यांच्या नावाला अनेकांचा विरोध असल्याचे आपण ऐकलं आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी ज्येष्ठ आणि प्रमुख माणूस त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, असंही भुजबळ म्हणाले. आणि हे खरंच आहे की, मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोकं होते त्यावेळेस एकनाथराव हे ज्युनिअर होते, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केले. मी 1991 पासून मंत्री आहे. अजित पवार हे देखील 1993 पासून मंत्री आहेत. त्यामुळे अनेक सिनिअरने असे मत व्यक्त केले असेल. त्याला पवारांनी दुजोरा दिला असेल असेही भुजबळ म्हणाले.

युतीत असलेल्या भाजपने 50-50 चा शब्द पाळला नाही. त्यामुळे तेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले होते. भाजपने शब्द पाळला असता, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे त्याबाबतीत अत्यंत प्रामाणिक आहेत. अजित पवार, त्यांचे सहकारी, तसेच शरद पवार यांनीही महाविकास आघाडीमध्ये शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यास नकार दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.