…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजितदादा गट आणि भाजपामध्ये जुंपली

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा-मिंधे गट-अजित पवार गटाच्या महायुतीला राज्यात सपाटून मार खावा लागला. फोडाफोडीचे राजकारण, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भ्रष्टाचाऱ्यांना आश्रय दिल्याने लोकांनी महायुतीला नाकारले आणि महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं टाकत 30 खासदार निवडून दिले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडूनही अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपला मोठा धक्का बसला. आता या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडले जात आहे.

भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र ‘द ऑर्गनायझर’मधूनही अजित पवार गटाला सोबत घेतल्याने भाजपाचा पराभव झाला अशी टीका करण्यात आली होती. तसेच अजित पवार गटाला सोबत घेतल्याने भाजपने स्वत:ची किंमत कमी करून घेतली, असा टोलाही यातून हाणला होता. आता लोकसभेनंतर विधानसभेचाही बिगुल वाजणार असून अजित पवार गटाबाबत भाजपच्या काही आमदारांमध्ये खदखद असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडले जात आहे. यामुळे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला असून अजित पवार यांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी भाजपाला दिला आहे. ‘टीव्ही-9’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने स्वत:ची किंमत कमी करून घेतली; संघाची चपराक

“आरएसएसच्या मुखपत्रामध्ये कोणीतरी एक लेख लिहिल्यानंतर सातत्याने अजित पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपाच्या बैठकीतही काही नेत्यांनी पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडले. जर अजित पवारांना अशाप्रकारे जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असेल तर आम्हालाही निश्चितपणे वेगळा विचार करावा लागेल”, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

अतिआत्मविश्वास नडला; संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी, RSS च्या कानपिचक्या