कोडीनच्या 3 हजार बाटल्या जप्त 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने आंतरराज्य कोडीन (खोकल्याच्या औषधाची) तस्करी करणाऱयांच्या मुसक्या आवळल्या. एनसीबीने कारवाई करून 15 लाख रुपये किमतीच्या 3 हजार कोडीनच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी तिघांना एनसीबीने अटक केली. एसआर अहमद, एम अस्लम आणि वाय खान अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यांनी त्या कोडीनच्या बाटल्या उत्तर प्रदेश येथून आणल्याचे तपासात समोर आले आहे.

नशेबाज हे गांजा, चरस, हशिश, एमडी ड्रगला पर्याय म्हणून व्हाईटनर आणि कोडीनचे व्यसन करतात.

स्वस्त आणि अधिक वेळ चालणारी नशा म्हणून कोडीनचे व्यसन नशेबाज करतात. कोडीन हे खोकल्याचे औषध डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाही. त्याचा फायदा तस्कर घेतात. बाहेरील राज्यातून अवैध मार्गे आणलेले कोडीन हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील झोपडपट्टय़ांमध्ये विकतात. खासी की दवा किंवा खो खो या कोडवर्डचा वापर करून तस्कर हे तरुणांना कोडीनची विक्री करतात. नशेबाज हे रुमालात ते औषध टाकून त्याचे व्यसन करतात.

मुंबईत काही तस्कर हे कोडीनची तस्करी करत असल्याची माहिती एनसीबी मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने उल्हासनगर येथे फिल्डिंग लावली. फिल्डिंग लावून एनसीबीने एसआर अहमद, एम अस्लम, आणि वाय खानला ताब्यात घेतले. त्या तिघांकडून 15 लाख रुपये किमतीच्या 3000 कोडीनच्या बाटल्या जप्त केल्या. त्यांनी त्या कोडीनच्या बाटल्या उत्तर प्रदेश येथून मागवल्या होत्या. उल्हासनगर येथे कोडीनचे पार्सल घेताना त्या तिघांना एनसीबीने गजाआड केले. उत्तर प्रदेश येथे त्या बाटल्या त्यांना कोणी दिल्या, कोणत्या पंपनीकडून त्यांनी त्या बाटल्यांचा साठा मागवला होता याचा तपास एनसीबी मुंबई युनिट करत आहे.