हरियाणात ‘वीज’ कडाडलीच नाही, मुख्यमंत्रीपदी पुन्हा नायब सिंह सैनी!

हरियाणातील मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर संपला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 8 दिवस झाले तरी मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला नव्हता. अखेर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीमध्ये नायब सिंह सैनी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. नायब सिंह सैनी 17 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळाले. भाजपने 90 पैकी 48 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवूनही येथे मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता.

भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल वीज यांच्याही मनात मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा होती. मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्याआधी त्यांनी हरियाणाला देशातील नंबर एकचे राज्य बनवेल असे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र अमित शहा यांनी स्वत: हरियाणा गाठत हा पेच सोडवला. त्यांच्या उपस्थितीत जे स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणत होते त्या अनिल वीज यांनीच या पदासाठी नायब सिंह सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.