गुरुवारी छत्तीसगडच्या सुकमा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील यावृत्ताला दुजोरा दिला आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाई करण्यासाठी जात असताना सकाळी 9 वाजताच्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्हा सीमेजवळील जंगलात ही चकमक उडाली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. परिसरात अद्याप शोध मोहीम सुरू असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
या कारवाईत सहभागी असलेल्या कोणत्याही सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
चकमकीच्या ठिकाणाहून एक सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर) आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
सुकमा, विजापूर आणि दंतेवाडा या तीन जिल्ह्यांतील डीआरजी, कोब्रा 205, 206, 208, 210 आणि 229 बटालियनच्या जवानांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, याआधी विजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले होते.
यावेळी जिल्हा राखीव रक्षक (डीआरएफ), विशेष कार्य दल (एसटीएफ) आणि जिल्हा दलाचे जवानांनी संयुक्त कारवाई केली.