गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगस्फोट, दुसरा बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश

एक मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट झाला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी बॉम्ब ठेवला होता. याची माहिती माहिती मिळताच घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक दाखल झाले. यातच पथक बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न करत असताना स्फोट झाला. मात्र दुसरा बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश आलं आहे.

या भूसुरुंग स्फोटात सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही. ऐन निवडणुकीत नक्षलवाद्यांनी खळबळ निर्माण करण्यासाठी हा भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, असं बोललं जात आहे. मात्र तपास यंत्रणांनी नक्षलवाद्यांचा हा कट उधळून लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील पर्लकोटा नदीवर पूल निर्मितीचे काम सुरु आहे. यासाठी येथे काही मजूर काम करत आहेत. यातच पुलाशेजारी रात्री मोठा आवाज झाला. हा स्फोटाचा आवाज होता. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाची माहिती मिळताच सकाळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यानंतर त्यांनी बॉम्ब निकामी पथकाला बोलावलं. घटनास्थळी तपासणी केली असताना पथकाला येथे आणखी एक बॉम्ब दिसला. जो त्यांनी निकामी केला.