गडचिरोलीत नक्षल दाम्पत्याची शरणागती

महाराष्ट्रासह ओडिशात माओवाद्यांच्या हिंसक चळवळीत काम करणाऱ्या दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांपुढे आज शरणागती पत्करली. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते. आंतरराज्य नक्षल दाम्पत्याच्या शरणागतीमुळे विविध हिंसक कारवाईंचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत (37, रा. मंडीकला ता. नरवाना जि. जिंद, हरियाणा) व अंजू सुळय़ा जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता (28,रा. गुरेकसा ता. धानोरा जि. गडचिरोली) असे या दाम्पत्याचे नाव आहे. असिन हा ओडिशात नक्षल चळवळीच्या प्रेस टीममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून काम करायचा, तर अंजू ही याच दलामध्ये सदस्य होती. 2018 पासून ते सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) येथे राहून नक्षल चळवळीसाठी काम करत होती.

असिन 2006 मध्ये माड एरिया प्रेस टीममध्ये भरती झाला. 2011 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता. 2013 मध्ये त्यांची बदली ओडिशात झाली. 2018 पर्यंत त्याने तेथे काम केले. त्यानंतर त्याने हिमाचल प्रदेशात आश्रय घेतला. 2013 मध्ये ओडिशातील उदंती व 2014 मध्ये ओडसा येथे जंगल परिसरातील चकमकीत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. अंजू जाळे ही 2007 मध्ये नक्षल चळवळीत आली. टिपागड दलममध्ये कमांडर दिनकर याची मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे 2010 ते 2012 यादरम्यान माड एरियातील मौजा घमंडी (छत्तीसगड) गावात जनताना सरकारच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणूनही तिने काम केले. 2013 पासून 2018 पर्यंत ओडिशा येथे प्रेस टीममध्ये हिंदी आणि गोंडी भाषेचे टंकलेखक म्हणून तिने काम केले. 2012 मध्ये लाहेरी व 2013 मध्ये ओडिशातील उदंती येथील चकमकीत ती सामील होती. महाराष्ट्रातील आत्मसमर्पित योजना चांगली असल्याने तिने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

माओवादविरोधी अभियान व आत्मसमर्पण योजनेमुळे 2022 ते आतापर्यंत 29 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, उपकमांडंट सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम गतिमान झाली आहे.

11 लाख मिळणार

असिन कुमार याच्यावर सहा लाख तर अंजू जाळेवर दोन लाखांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते. आत्मसमर्पण योजनेंतर्गत आता या दाम्पत्यास 11 लाख रुपये मिळणार आहेत.