भाजपच्या विरोधाला अजितदादांनी दाखवली केराची टोपली, फडणवीसांच्या पत्रानंतरही ‘तो’ आमदार बैठकीला हजर!

येत्या 12 जुलै रोजी राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या 11 जागांसाठी 14 जणांनी अर्ज दाखल केले आहे. यामुळे विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. अर्थात अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रावारी, त्यानंतरच प्रत्यक्षात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असून अजित पवार गटही तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीला नवाब मलिक यांनीही हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांनी आमदारांना हाताशी धरत बंडखोरी केली आणि सत्तेची कास धरली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवार यांचा. राष्ट्रवादीच्या या फुटीनंतर तुरुंगाबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी काही काळ तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र नंतर ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने भारतीय जनता पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. आता मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीलाही ते हजर राहिल्याने महायुतीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाला पाठिंबा?

देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या अजित पवार गटाच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते. रामराजे निंबाळकर आणि हसन मुश्रीफ यांच्या बाजूला ते बसल्याचे फोटोतून स्पष्ट होत आहे. यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

मलिकांना विरोध, फडणवीसांचे पत्र

नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्य़ास भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अजित पवार यांना थेट पत्रही लिहिले होते. यात त्यांनी नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवत भाजपची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र भाजपच्या या विरोधाला केराची टोपली दाखवत अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीस नवाब मलिक उपस्थित राहिले. यावर आता भाजप काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेची निवडणूक चुरशीची; 11 जागांसाठी 14 उमेदवार

अजितदादा टार्गेटवर

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीने सपाटून मार खाल्ला. महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवाचे खापर आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांवर फोडले. अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका बसल्याचे आणि त्यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यात आता अजित पवारांनीही भाजपचा विरोध डावलून नवाब मलिक यांना सोबत घेतल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया