हिंद महासागरात ताकद वाढवण्याचा चीन आणि पाकिस्तानचा प्रयत्न आहे. हिंदुस्थानी नौदलही चीन, पाकिस्तानला सागरी टक्कर द्यायला सज्ज आहे. लवकरच हिंदुस्थानी नौदलाला तिसरी आण्विक पाणबुडी मिळणार आहे. आयएनएस अरिदमन असे तिसऱ्या पाणबुडीचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून तिची चाचणी सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस आयएनएस अरिदमनचा समावेश नौदलाच्या ताफ्यात होईल.
हिंदुस्थानी नौदलाकडे सध्या दोन आण्विक पाणबुडय़ा आहेत. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात. यानंतर आता आयएनएस अरिदमन या वर्षीच्या अखेरपर्यंत नौदलाला मिळेल. हिंदुस्थानच्या तुलनेत चीन सातत्याने पाणबुड्यांच्या माध्यमातून आपली समुद्री ताकद वाढवत आहे. या वर्षापर्यंत चीनकडे 65 पाणबुड्यांचा ताफा आहे. पाकिस्तानदेखील चीन आणि तुर्कीच्या मदतीने नौदलाचे आधुनिकीकरण करत आहे.
हिंदुस्थानी नौदलाकडे पहिली आण्विक हल्ला पाणबुडी 2035 पर्यंत तर दुसरी 2038 पर्यंत येईल. अलीकडेच नौदलाला 6 कलावरी श्रेणीच्या पारंपरिक पाणबुडय़ा मिळाल्या. याशिवाय फ्रान्सकडून आणखी 3 कलावरी पाणबुडय़ा घ्यायचा विचार आहे.
हिंदुस्थान आणि जर्मनीमध्येही 6 अत्याधुनिक पाणबुडय़ा खरेदी करण्याची चर्चा आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, या वर्षाअखेरपर्यंत तांत्रिकी बाबी पूर्ण होतील आणि जर्मनीकडून पहिली पाणबुडी 2030 मध्येच हिंदुस्थानला मिळेल.
चीनकडे आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या 6 पाणबुडय़ा, 6 आण्विक हल्ला पाणबुडय़ा आणि डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या एसआयपी तंत्रज्ञानाच्या 48 पाणबुडय़ा आहेत.
पाकिस्तान चीनकडून हंगोर श्रेणीच्या 8 पाणबुडय़ा घेणार आहे. एसआयपी तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा या पाणबुडय़ा आहेत.