मानवी तस्करी प्रकरणी नौदल अधिकाऱ्यासह महिलेला अटक; जम्मू-कश्मीर व्हाया दक्षिण कोरिया

बनावट कागदपत्रांच्या आधारे व्हिसा तयार करून जम्मू-कश्मीर येथील नागरिकांना दक्षिण कोरियाला पाठवल्याप्रकरणी आणखी एक नौदल अधिकाऱयासह महिलेला गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) ने अटक केली. सब-लेफ्टनंट ब्रह्मज्योती आणि सिमरन तेजी अशी त्या दोघांची नावे आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे जम्मू-कश्मीर येथील लोकांना दक्षिण कोरिया येथे पाठवले जात असल्याबाबत एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. त्याच दरम्यान काही जण जम्मू येथील नागरिकांना दक्षिण कोरिया येथे पाठवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सीआययूला मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा नोंद केला. त्याचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपवण्यात आला. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तपास करून नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर विपिन डोगराला कुलाबा येथून अटक केली.

डोगरा हा बनावट कागदपत्रे तयार करून दक्षिण कोरियाच्या दूतावासात पाठवत असायचा. डोगराच्या चौकशीत सब-लेफ्टनंट ब्रह्मज्योतीची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी ब्रह्मज्योतीला ताब्यात घेऊन अटक केली. ब्रह्मज्योतीच्या सूचनेनुसार डोगरा हा काम करत होता. त्याच्या चौकशीत सिमरनचे नाव समोर आले. तिला देखील पोलिसांनी अटक केली. सिमरनने तिच्या विविध बँक खात्यात काही रक्कम जमा केली होती. तिने ब्रह्मज्योतीच्या नावाचे खोटे मोबाईल तपशील देऊन बँकेत खाती उघडली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.