इंद्रगढी देवी संस्थान नवरात्र उत्सवासाठी सज्ज; गुरुवारी घटस्थापना

घाटनांद्रा येथून जवळच सागमाळ शिवारात डोंगराच्या कुशीत वसलेल्या व माहूरच्या रेणुका मातेचे उपपीठ समजल्या जाणाऱ्या जगदंबा इंद्रगढी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी संस्थान सज्ज झाले आहे. नवरात्र उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष रामराव सुलताने यांनी सांगितले. शारदीय नवरात्र उत्सवाला अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवार, 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून, सांगता शनिवार, 12 आक्टोबर रोजी सीमोल्लंघनाने होणार आहे.

ब्रह्मलीन जबलपूरकर स्वामी यांच्या आशीर्वादाने सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सावासाठी इंद्रगढी देवी संस्थान सज्ज झाले असून, मंदिर परिसरात साफसफाईची कामे, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या दिवशी देवीची पंचामृताने स्नान विधी महापूजा, अभिषेक, घटस्थापना, सप्तशतीचे पाठ, देवीची अलंकार पूजा, अष्टमीचा होम हवन, शमिपूजन असे धार्मिक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

इंद्रगढी देवीचे मंदिर हे गडावर असल्याने संपूर्ण डोंगर चढून वर जावे लागते. मंदिरात गेल्यावर इंद्रगढी देवीची मूर्ती पाहिल्यावर मन प्रसन्न होऊन जाते. हे जागृत ठाणे असून, देवी भाविकांच्या नवसाला पावणारी आहे. दर्शनासाठी येणारे भाविक देवीला साडीचोळी वाहून खणा- नारळाने ओटी भरतात. वर्षभर खान्देश व मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनाला व नवरात्रात आवर्जुन हजेरी लावतात. भाविकांना देवीचे दर्शन लवकर व सुलभ व्हावे यासाठी मंदिर परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांग उभारण्यात आल्या असून, मंदिराच्या आवारात बॅरिकेट्स लावण्यात, आले आहेत. यामुळे भाविकांना शांततेत देवीचे दर्शन घेता येणार आहे. तसेच भाविकांना गडावर जाण्यासाठी चांगला व पक्का रस्ता करण्यात आल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यावसायिकांनी गडावर बेल, फूल, प्रसादाची दुकाने, कटलरी सामान अशी विविध प्रकारचे दुकाने थाटून गडावरची शोभा वाढवावी व नवरात्र उत्सवाच्या पर्वकालावर परिसरातील जास्तीत-जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंद्रगढी देवी संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, समाधान पाटील सोनवणे, श्याम गुळवे, रामचंद्र मोरे, रामजी मोरे, शंकर मोरे, रामराव सुलताने, दगडूलाल खत्ती, त्रिंबक सोनवणे, अरविंद देशपांडे, नामदेव पवार, रत्नाकर भरकर, भिकन मोरे, राहुल झारेकर, संजय अंभोरे, लक्ष्मण जाधव आदींनी केले आहे.