‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा-2’ने शुक्रवारी पहिल्याच दिवशी तब्बल 1 कोटी 86 लाख रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शुक्रवारी चित्रपटाचे तिकीट दर फक्त 99 रुपये असतानाही या चित्रपटाने घसघशीत कमाई केली. ‘नवरा माझा नवसाचा-2’मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का, याची धमाल गोष्ट या चित्रपटात आहे. अभिनेते अशोक सराफ या चित्रपटात बस पंडक्टरऐवजी रेल्वे तिकीट निरीक्षकाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.