मुंबईतील उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमीच प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असलेल्या नवोदित मुंबई श्रीचा उत्साहवर्धक पीळदार सोहळा येत्या रविवारी 15 डिसेंबरला परळ येथील केईएम रुग्णालयासमोरील कामगार मैदानात रंगणार आहे. शरीरसौष्ठवपटू घडवणारी हर्क्युलस फिटनेस आणि विक्रांत देसाई या स्पर्धेच्या दिमाखदार आयोजनासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदा परळमध्ये शेकडो नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा आखीवरेखीव थरार पाहायला मिळणार हे निश्चित आहे.
दिवसेंदिवस शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. त्यातच फिटनेसच्या गुलाबी वातावरणात डंबेल्स मारून बेटकुळ्या काढण्याचे प्रमाणही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेय. अशाच हौशी आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्याच शरीरसौष्ठवाची आवड वाढावी म्हणून हर्क्युलसने नवोदित मुंबई श्रीच्या निमित्ताने मुंबईकरांचे शरीरसौष्ठव प्रेम उफाळून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
नवोदित खेळाडूंना ऊर्जा मिळावी म्हणून आयोजकांनी लाखाची रोख बक्षिसेही जाहीर केली आहेत. एकंदर सात गटांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अव्वल पाच खेळाडूंना 5, 4, 3, 2 आणि 1 हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेचा विजेता 21 हजार रुपयांचा मानकरी ठरेल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुनील शेगडे (9223348568), विशाल परब (8928313303) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.