असं म्हणतात की, ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही.’ नेमकं याच उक्तीप्रमाणे 69 वर्षीय मराठमोळ्या नवनाथ झांजुर्णे यांनी सातासमुद्रापार बहरिनमध्ये (मध्य- पूर्व) नुकत्याच झालेल्या ‘आयर्न मॅन 70.3’ या स्पर्धेत हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकावीत ‘आयर्न मॅन’ किताबावर आपले नाव कोरले. ते आता हिंदुस्थानातील सर्वांत ज्येष्ठ ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी ठरले आहेत, हे विशेष.
‘आयर्न मॅन 70.3’ स्पर्धा म्हणजे एका दमात केलेले 1.9 किलोमीटर समुद्रातील स्विमिंग, 89 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे होय. गतवर्षी तुर्कस्तानला झालेल्या याच स्पर्धेतून काही कारणामुळे नवनाथ झांजुर्णे यांना ‘आयर्न मॅन’ किताबाने हुलकावणी दिली होती.
या स्पर्धेतील अपयशामुळे त्यांना रडू कोसळले होते. कारण तीन वर्षे केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले नव्हते. मात्र, तुर्कस्तानातून परतल्यानंतर नवनाथ झांजुर्णे हे नव्या जोमाने तयारीला लागले. चैतन्य वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिथं ते कमी पडले होते, त्या कच्च्या गोष्टी सुधारण्यावर त्यांनी भर दिला. जलतरणात सुधारणा केली. सायकलिंग, धावणे याचाही सराव सुरूच ठेवला. श्वसनावर कंट्रोल हवा म्हणून नियमित प्राणायाम केला. याचबरोबर स्पर्धेचा तणाव कमी करण्यासाठी पहाटे मेडिटेशन सुरू केले. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट सुरू केला. कोरोनापूर्वी नवनाथ झांजुर्णे यांचे वजन 90 किलो होते. त्यांनी तब्बल 25 किलो वजन कमी केले.
सून व नातवंडेही सोबत पळाली!
बहरिनमधल्या भरदुपारच्या उन्हात 12 वाजता नवनाथ झांजुर्णे जेव्हा रस्त्यावर पळत होते, तेव्हा त्यांची दोन्ही नातवंडे सई आणि शिवबा हातात मोटिव्हेशनल घोषणा लिहिलेल्या पाट्या घेऊन फुटपाथवरून पळत होते. बहरिनमध्ये डॉ. स्मिता झांजुर्णे यांनीसुद्धा त्यांच्या सासऱ्यांबरोबर स्वतःच सहावं ‘आयर्न मॅन’ मेडल मिळवलं. अजून एक संस्मरणीय गोष्ट या स्पर्धेत घडली, ती म्हणजे साडेआठ तासांत नवनाथ झांजुर्णे यांनी रेस संपवत फिनिश लाइनकडे येऊ लागले, तेव्हा निवेदकाने उद्घोषणा केली की, ’69 वर्षीय एक हिंदुस्थानी फिनिश लाइनकडे येत आहे.’
नवनाथ झांजुर्णे ज्यावेळी फिनिश लाइनजवळ आले, तेव्हा त्यांना चीअरअप करण्यासाठी आणि एक सन्मानपूर्वक कृती म्हणून त्यावेळी तिथे उपस्थित असलेले स्पर्धेचे सगळे स्वयंसेवक, ऑफिशियल्स शेवटचे 200 मीटर अंतर त्यांच्यासोबत पळाले. अशा प्रकारे नवनाथ झांजुर्णे यांनी तिरंगा हातात घेऊन फिनिश लाइन क्रॉस करून प्रतिष्ठेचा ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळवला.