नवी मुंबईतील हजारो विद्यार्थी होणार मालामाल; ऑगस्टमध्ये बँक खात्यात जमा होणार 30 कोटींची शिष्यवृत्ती

नवी मुंबई शहरात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणारे हजारो गुणवंत विद्यार्थी आता मालमाल होणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुमारे ३० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या शिष्यवृत्ती योजनेसाठी शहरातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी आठ हजार विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने कागदपत्र सादर करण्याची संधी महापालिका प्रशासनाने दिली आहे. पात्र ठरलेल्या सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी फक्त महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र नाहीत. शिष्यवृत्ती योजनेसाठी पूर्वी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये होती. मात्र आता ती थेट सात लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाची शिष्यवृत्ती देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. या योजनेसाठी सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जाची छाननी महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात आली. या छाननीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेले सर्वच कागदपत्र सादर केले नाहीत. कागदपत्र अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे आठ हजार इतकी आहे. त्यांना पुन्हा नव्याने कागदपत्र सादर करण्यासाठी उद्या शुक्रवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी होऊन ते पात्र ठरले आहेत, त्यांच्या बँक खात्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिष्यवृत्तीची रक्कम टाकण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने बँक खात्यात रक्कम टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

एकही विद्यार्थी वंचित न ठेवण्याचे प्रयत्न
महापालिकेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यांची छाननी पूर्ण झाली आहे. जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत, त्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. काही विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत त्यांना प्रशासनाने कागदपत्र सादर करण्याची पुन्हा संधी दिली आहे. दिलेल्या वेळेत त्यांनी आपले कागदपत्र सादर करावेत. या योजनेसाठी अर्ज केलेला एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, हाच प्रयत्न प्रशासनाचा आहे, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.