
खोपोलीजवळील इमॅजिका पार्कमध्ये एका आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली रद्द केल्या आहेत. सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांच्या सहली इमॅजिका पार्कमध्ये जाणार होत्या. परीक्षा संपल्यानंतर या सहलींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भर उन्हाळ्यात काढलेल्या या सहलींवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने या सहली रद्द करण्याचा निर्णय घेतला.
इमॅजिका पार्क येथे काढण्यात आलेल्या सहलीदरम्यान पालिका अधिकारी आणि सहल काढणारा ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे घणसोली येथील पालिकेच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, उपशहरप्रमुख समीर बागवान, महेश कोटीवाले, विभागप्रमुख मिलिंद भोईर, बाबू तळेकर, सिद्धराम शिलवंत, निखिल मांडवे, संकेत मोरे आदी उपस्थित होते.
इमॅजिका पार्कमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, उपायुक्तांना निलंबित करा
सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तरीही पालिका प्रशासनाने या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले ही खेदाची बाब आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशीच्या कालावधीत शिक्षण विभागाचे उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे. चौकशीसाठी कालमर्यादा ठरवून देण्यात यावी. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी दिला आहे.