गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची फसवणूक, गुन्हे शाखेकडून तपास सुरू

गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची 3 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. महिलेने पैशाची मागणी करताच तिला दुबईच्या एका व्यक्तीकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

नवी मुंबई येथे राहणाऱ्या महिला या तक्रारदार आहेत. त्या गेल्या वर्षापासून दुबई येथे राहतात. चार वर्षांपूर्वी तिची एका कंपनीच्या मालकाशी ओळख झाली होती. त्या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे तिला सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने गुंतवणुकीचा निर्णय घेतला. तिने 3 कोटी 85 लाख रुपयाची गुंतवणूक केली. त्यांच्यात एक करार झाला.

अकरा महिने उलटून गेल्यानंतर तिला गुंतवलेली रक्कम परत मिळाली नव्हती. तिने पैशासाठी विचारणा केली. तो टाळाटाळ करत होता. दुबई येथे काही अंडरवर्ल्डशी संबंधित असणाऱ्याशी संबंध आहे. पैशासाठी फोन करू नकोस नाही तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. याबाबत महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. याचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केला आहे.