अबब… गुंठ्याला मिळाला साडेपाच कोटींचा दर, खारघरमध्ये भूखंडाचा सर्वात महागडा सौदा

नवी मुंबई शहराचा उदय झाल्यानंतर सिडकोने खारघरच्या इतिहासात भूखंडाचा प्रथमच सर्वात महागडा सौदा केला आहे. सेक्टर 14 मधील 3 हजार 235 चौरस मीटरच्या भूखंडाला तब्बल 5 लाख 54 हजार 999 रुपये चौरस मीटरचा विक्रमी दर मिळाला आहे. सिडकोने मागविलेल्या निविदांमध्ये या भूखंडासाठी 2 लाख 34 हजार 575 रुपये चौरस मीटरचा दर देण्यात आला होता. विहान रिअ‍ॅलिटी बांधकाम समूहाने दुप्पट दराने हा भूखंड खरेदी केला आहे. हा भूखंड घेण्यासाठी या समूहाला गुंठ्याच्या मागे 5 कोटी 54 लाख 99 हजार 999 रुपये दर मोजावा लागला आहे.

खारघर, ऐरोली, घणसोली, द्रोणागिरी आणि कळंबोली येथील सुमारे 28 भूखंडांच्या विक्रीसाठी सिडकोने निविदा मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत सर्वात जास्त किंमत खारघर सेक्टर 14 मधील भूखंडांना मिळाली. याच सेक्टरमधील 4 भूखंड विहान रिअ‍ॅलिटी या बाधकाम समूहाने घेतले. विशेष म्हणजे या भूखंडाच्या ई-ऑक्शनपेक्षा बंद निविदेमध्ये भूखंडाची किंमत चढ्या दराने टाकलेली होती.

विहान रिअ‍ॅलिटीने घेतलेल्या एका भूखंडाला 5 कोटी 54 लाख 99 हजार 999 रुपये गुंठा याप्रमाणे दर मिळाला. विहान रिअ‍ॅलिटीने दुसरा भूखंड 4 लाख 49 हजार, तिसरा भूखंड 5 लाख 13 हजार आणि चौथा भूखंड 5 लाख 4 हजार रुपये चौरस मीटर या दराने खरेदी केला. याच सेक्टरमधील अन्य दोन भूखंड अन्य दोन बांधकाम व्यावसायिकांनी अनुक्रमे 5 लाख 4 हजार आणि 4 लाख 75 हजार रुपये चौरस मीटर या दराने घेतले. सर्वात कमी दर कळंबोली आणि द्रोणागिरीमधील भूखंडांना मिळाले. हे भूखंड अनुक्रमे 74 हजार आणि 54 हजार रुपये चौरस मीटर या दराने विकले गेले. या भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला मोठे लक्ष्मीदर्शन झाले आहे.

नवी मुंबई सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

नवी मुंबईत जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. वाशी, नेरुळ आणि खारघरच्या पाठोपाठ सर्वच ठिकाणी भूखंडांनी आता कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे. भूखंडांपाठोपाठ सिडकोने घरांच्या किमतीही अवाचे सवा वाढवल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याची प्रतिक्रिया अनेक रिअल इस्टेट तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.