पालिका शाळेतील 162 विद्यार्थी शिष्यवृत्तीत झळकले, स्वराली जगधने प्रथम; तर यश खरगे दुसरा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महापालिका शाळेतील 162 विद्यार्थी झळकले आहेत. ही परीक्षा शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये महापालिका शाळांमधून 1 हजार 125 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 162 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. स्वराली जगधने ही शहरात प्रथम तर यश खरगे हा दुसरा आला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 42, घणसोली गावमधील स्वराली जगधने ही विद्यार्थिनी ठाणे जिल्ह्यातून तिसरी आली असून नवी मुंबईतून प्रथम क्रमांकाने यशस्वी झालेली आहे.

शाळा क्रमांक 55, राजश्री शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर, कातकरी पाडा, रबाळे येथील यश खरगे हा विद्यार्थी गुणानुक्रमे नवी मुंबईतून द्वितीय क्रमांकांने शिष्यवृत्ती प्राप्त ठरलेला आहे.