नवी मुंबई मेट्रोचा प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. सध्या 25 किलोमीटर वेगमर्यादा असलेली मेट्रो आता ताशी ६० किमी धावणार असून बेलापूर-पेंधर प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायासाठी मुंबई व ठाणे गाठणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान गुणवत्ता व्यवस्थापन, व्यावसायिक स्वास्थ्य तथा सुरक्षा व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली ही तीनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.
नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाने नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या मार्गिकेवरील वेगाची चाचणी केली. लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटरने सुसाट धावणार आहे. यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना जलदगतीने अंतर कापता येणार आहे. सिडको महामंडळाने बांधलेल्या नवी मुंबई मेट्रोचे संचलन सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कंपनीमार्फत सुरू आहे. आतापर्यंत 60 लाख प्रवाशांनी या मेट्रो सेवेचा लाभ घेतला असून सिडकोला तिकीट दरातून 14 कोटी 50 लाख रुपये महसुली उत्पन्न मिळाले आहे.
दरम्यान सरळ मार्गिकेवर 70 किलोमीटरच्या वेगाने मेट्रो धावू शकेल, तर वळण मार्गावर मेट्रोची गती कमी ठेवण्यात येणार आहे. पुढील दीड महिन्यात वेग चाचणीचे प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर नवी मुंबई मेट्रोतून प्रवाशांना अवघ्या पंधरा मिनिटांत बेलापूर ते पेंधर अंतर कापता येणार आहे.
दर दहा मिनिटांनी धाव
बेलापूर ते पेंधर या 11.1 किलोमीटरच्या अंतरावर 11 विविध मेट्रो स्थानके आहेत. 20 जानेवारीपासून सिडकोने मेट्रो मार्गावर सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली आहे. बेलापूर येथून सकाळी साडेसात ते दहा वाजता आणि सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत, तर पेंधर येथून सकाळी सात ते साडेनऊ आणि सायंकाळी पाच ते साडेसातदरम्यान दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू आहे. गर्दीच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेंधर येथून दर 15 मिनिटांनी मेट्रो धावत आहे.