बांधकाम क्षेत्रातील मजबुतीकरणाचे नवे पर्व; नवी मुंबईत 120 ग्रीन बिल्डिंग प्रकल्प

 

नवी मुंबई शहरात 120 हून जास्त ग्रीन बिल्डिंग प्रकल्प सुरू झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातील मजबुतीकरणाचे हे नवे पर्व सुरू झाल्यानंतर त्याची दखल इंडियन ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलच्या (आयजीबीसी) वतीने घेण्यात आली आहे. ग्रीन बिल्डिंग प्रकल्पाच्या बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 610 दशलक्ष चौरस फूट आहे. या प्रचंड शहरीकरणाला आणि त्याच्या वाणिज्यिक व निवासी रिअल इस्टेट विकासाला टिकाऊ आणि पर्यावरणपूरक मार्गावर ठेवण्यासाठी आयजीबीसीचा पुढचा चॅप्टर (करार) नवी मुंबईत सुरू करण्यात आला आहे.

सीआयआय-आयजीबीसी हिंदुस्थानातील प्रमुख ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र संस्था आणि संबंधित सेवांसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेने नवी मुंबईत आपला ३० वा चॅप्टर सुरू केला आहे. नवी मुंबई महापालिकेचे नगररचना सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांच्या हस्ते या चॅप्टरचे उद्घाटन करण्यात आले. आर्किटेक्ट हितेन सेठी हे या चॅप्टरचे अध्यक्ष आहेत, तर अरिहंत समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अशोक छाजेर हे सहअध्यक्ष आहेत. उद्घाटनप्रसंगी नॅशनल व्हाइस चेअरमन सी. शेखर रेड्डी, एनएमएमसीचे वरिष्ठ अधिकारी, सीआयआय-आयजीबीसीचे प्रमुख पदाधिकारी, तसेच नवी मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिक, विकासकर्ता आणि आर्किटेक्ट्स उपस्थित होत.

पर्यावरणावर कमी परिणाम करणाऱ्या इमारतींची गरज

नवी मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आम्ही पाहिलेल्या वाढीचा आणि या शहराच्या आशादायी भविष्यातील प्रतीक आहे हा चॅप्टर. रिअल इस्टेट क्षेत्राची प्रगती होत असताना पर्यावरणावर कमी परिणाम करणाऱ्या इमारतींचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे, जे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून त्यांचा पर्यावरणीय प्रभाव कमी करतात, ज्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात मोठी घट येऊ शकते. आयजीबीसीसोबत घनिष्ठ सहकायनि काम करण्यास पालिका उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया नगररचना सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी व्यक्त केली.