Thane crime news – चिमुरडीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला, दोन दिवसांपासून बेपत्ता होती

दोन वर्षीय चिमुरडीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबल्याची धक्कादायक घटना तळोजा येथील देवीचा पाडा परिसरात घडली आहे. हर्षिका शर्मा असे हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव असून ती मंगळवारपासून बेपत्ता होती. अचानक बाथरूममधील पोटमाळ्यावर असलेल्या सुटकेसमधून दुर्गंधी येऊ लागल्याने आईवडिलांनी शोध घेतला असता त्यांना चिमुरडीचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर चिमुरडीच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

हर्षिका ही मंगळवारी खेळण्यासाठी घराबाहेर गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. आज सकाळी हर्षिकाच्या आईवडिलांना बाथरूममधील पोटमाळ्यावर ठेवलेल्या सुटकेसमधून दुर्गंधी येऊ लागली. यावेळी तिच्या कुटुंबीयांना उंदीर मेल्याचा संशय आला. मात्र सुटकेस उघडताच त्यांना धक्का बसला. त्यात लाडक्या चिमुकलीचा मृतदेह बघून आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

वाद आणि पैशांच्या हव्यासातून भयंकर कृत्य

तळोजा पोलिसांनी क्राईम ब्रँचच्या मदतीने तपास केला असता मुलीच्या घरासमोर राहणारा मोहम्मद अन्सारी याने जुने भांडण आणि पैशांच्या हव्यासापोटी तिला संपवल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मोहम्मद याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्यानेच मुलीला ठार मारून सुटकेसमध्ये कोंबल्याची कबुली दिली.