लवकरच महाराष्ट्रवासीयांना नवी मुंबई विमानतळावरून देशविदेशात जाण्यासाठी झेपावता येणार आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु असून येत्या 5 ऑक्टोबरला धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. कंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही टेस्ट होण्याची शक्यता आहे. विमानतळावर चार टर्मिनल असून एकाचवेळी 350 विमाने पार्क होणार आहेत.
मेट्रोसह बुलेट ट्रेन आणि लोकलची कनेक्टिव्हीटीही नवी मुंबई विमानतळाला असणार आहे. एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाद्वारेही नवी मुंबई विमानतळावर पोहोचता येणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे.
नेमका कसा आहे प्रकल्प?
नवी मुंबई विमानतळ उलवे आणि पनवेलदरम्यान 1,600 हेक्टरवर तयार होत आहे.
तब्बल 19 हजार 600 कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारण्यात येत आहे.
एयरपोर्ट पाच टप्प्यांत पूर्ण होणार असून सिडकोचे संचालक विजय सिंघल, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. विमानतळाचा पहिला टप्पा व्यावसायिक वापरासाठी 31 मार्च 2025 पर्यंत खुला करण्याचे नियोजन आहे.