
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जूनमध्ये होणाऱ्या विमानाच्या टेक ऑफचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर विमानासाठी आवश्यक असलेले इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्यूल विमानतळावर आले आहे. प्रथमच विमानतळावर हे इंधन घेऊन येणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या टँकरचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. विमानांना इंधन पुरवठा करण्यासाठी नवी मुंबई विमानतळावर सात महाकाय टैंक तयार करण्यात आले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. या प्रकल्पाला अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी 16 मार्च रोजी भेट दिली आणि प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटनाची पुन्हा नव्याने घोषणा केली. त्यानुसार या विमानतळावरून विमानाचे टेक ऑफ आता जून महिन्यात होणार आहे. उद्घाटनाची ही डेडलाईन पाळण्यासाठी विमानतळाची शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आता कमालीचा वेग आला आहे. विमानतळाची धावपट्टी सर्वच चाचण्यांत पास झाल्यानंतर भारत पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेडने विमानाच्या इंधनाचे दोन टँकर नवी मुंबई विमानतळावर पाठवले. विमानतळावर प्रथमच आलेल्या एव्हिएशन टर्बाईन फ्यूलचे विमानतळ हॅण्डलिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. विमानतळावर इंधनाचे टँकर आल्यामुळे आता नवी मुंबईकरांच्या विमान प्रवासाचे स्वप्न दृष्टिक्षेपात आले आहे.
दोन जमिनीवर, पाच भूमिगत
विमानांना इंधनाचा पुरवठा करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण सात टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन टाक्या जमिनीवर तर पाच टाक्या भूमिगत आहेत. जमिनीवरील एका टाकीची क्षमता 2 कोटी 40 लाख लिटर इतकी तर दुसऱ्या टाकीची क्षमता 60 लाख लिटरची आहे. भूमिगत तयार करण्यात आलेल्या पाच टाक्यांची क्षमता प्रत्येकी एक लाख लिटर इंधनाची आहे. या सर्वच टाक्यांचे काम पूर्ण झाले असल्याने त्यांच्यामध्ये इंधन साठवण्यात येणार आहे.
विमानांसाठी आवश्यक असलेले एव्हिएशन टर्बाईन फ्यूल हे इंधन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या टँकरमधून आणण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळावर तयार करण्यात आलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून ते विमानापर्यंत पोहोचणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंधनाचे टँकर आल्यामुळे विमानाचे उड्डाण आता अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे एक टर्मिनल दुरुस्तीसाठी बंद होणार असल्याने तेथील विमानांची वाहतूकही नवी मुंबई विमानतळावर वळवण्यात येणार आहे.
या विमानतळावरून सुरुवातीला देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार ३ आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांचे लौंडंग आणि टेकऑफही होणार आहे. विमानतळ सुरू झाल्यांनतर पहिल्या टप्प्यात दररोज अडीचशे विमानांचे उड्डाण होणार आहे.
उद्घाटन जूनमध्येच होणार
नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वी जवळपास सहा डेडलाईन देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एकही डेडलाईन पाळली गेली नाही. चालू महिन्यातील 17 तारीख उद्घाटनासाठी नक्की करण्यात आली होती. मात्र ही डेडलाईनही हुकली गेली आहे. मात्र आता जूनची डेडलाईन हुकणार नाही. विमानतळाचे उद्घाटन जूनमध्येच होणार आहे, असे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले आहे.