मनतरंग – नवदुर्गा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

केअरगिव्हर म्हणजेच काळजी घेणाऱया व्यक्तींना स्वतला सक्षम बनवावं लागतं. या व्यक्तींनी मानसिकदृष्टय़ा कणखर आणि तटस्थ असणं गरजेचं असतं कारण त्यांचीही मानसिक पातळीवर पडझड होण्याची शक्यता असते. अशाच पायरीवर चारूताईंनी स्वतला सांभाळलं. अगदी नवदुर्गेप्रमाणे परिस्थितीवर मात करण्यासाठी त्या सज्ज झाल्या.

मॅम, मला खरंच सगळं सोडून द्यावंसं वाटतं आहे. नको ती फॅमिली आणि नको कुठली जबाबदारी. अक्षरश हिमालयात जाऊन राहावंसं वाटतं आहे.” चारुताई पोटतिडकीने सांगत होत्या. “सावनी आता बघेल तिचं स्वतचं. नाहीतरी तिला मी जन्मभर पुरणार तर नाही. स्वतला नाहीतरी शहाणी समजते ती,” असा तिचा त्या उद्धार करत होत्या. चारूताईंची सावनी (दोघींची नावे बदलली आहेत) ही एकुलती एक मुलगी. नुकतंच तिला बाविसावं वर्ष लागलं होतं आणि त्यात तिला क्लिनिकल डिप्रेशन या आजाराचं निदान झालं होतं. या आजारात सावनी अक्षरश दिवस दिवस झोपेत काढायची. तिला उत्साह असा नव्हताच. काही वेळा जर नैराश्य जास्त असेल तर तिला कसले तरी भासही व्हायचे.

चारूताई एकल पालक होत्या. पाच वर्षांपूर्वीच त्या पतीपासून वेगळ्या झाल्या होत्या. त्यांनी सावनीची जबाबदारी स्वीकारली होती. सावनीचे नैराश्याचे निदान आधीच झाले होते आणि तेच चारूताईंच्या घटस्फोटाचेही कारण ठरले होते. सावनीला असाच एकदा नैराश्याचा झटका आला आणि ती शाळेत बिथरली. तिने स्वतला संपविण्याचा प्रयत्न केला होता. शाळेने त्याच वेळी दोघा पतिपत्नीला बोलावून आवश्यक ते उपाय करायला सांगितले. चारूताईंच्या घरी यामुळे भरपूर वादळ आले. सावनीला तातडीने मानसोपचार सुरू करण्यात आले, पण त्या वेळी चारूताईंना घरच्यांची, विशेषत पतीची बिलकूल साथ मिळाली नाही. त्याच्या मते सावनीच्या नैराश्याचे कारण या चारुताई होत्या. एकीकडे सावनीचे आजारपण आणि दुसरीकडे सासरचे अशी कात्रीत अडकल्यासारखी त्यांची अवस्था झाली. सावनीच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. मानसोपचार करूनही तिच्यात म्हणावी तशी सुधारणा होत नव्हती. त्यांचा पती तर सावनीपासून दूर होऊ लागला होता. शेवटी सासरच्या टोमण्यांना आणि पतीच्या दूषणांना कंटाळून चारूताई सावनीला घेऊन वेगळ्या झाल्या.

‘’त्या वेळी मला पहिल्यांदा एकटेपण काय असतं हे जाणवलं, पण हिच्याकडे पाहून मन घट्ट केलं. बऱयाच गोष्टींचा सामना मला करावा लागला. नोकरी करत नव्हते, पैशांचा प्रश्न निर्माण झाला होता. सावनीवर तर उपचार गरजेचेच होते आणि तिच्यावर लक्ष ठेवणंही माझ्याकडे होतं. माझे आईवडील होते म्हणून मी नोकरी तरी करू शकले, पण तिला वेळोवेळी डॉक्टर आणि समुपदेशकांकडे घेऊन मलाच जावं लागायचं. तिच्यात फरक पडत होता. सगळं मार्गी लागत होतं. शिक्षणही चालू होतं. तिच्याबद्दल शाळा, कॉलेजमध्ये माहीत असल्याने सावनीला सगळ्यांनी सांभाळूनही घेतलं… आणि ही प्रेमात पडली” असं म्हणून चारूताईंनी उसासा सोडला आणि गप्प झाल्या.

त्यांच्या त्राग्याचे कारण त्यांच्याशी बोलताना जाणवायला लागले होते. सावनी तिच्याच वर्गातल्या एका मुलावर प्रेम करत होती आणि त्याच्याशीच लग्न करणार म्हणून हटून बसली होती. तो मुलगाही अजून शिकत होता. त्याने थोडे थांबायचे ठरवले होते, पण सावनीला असुरक्षितता निर्माण झाली होती आणि त्यात तिचा ताण वाढायला लागला. त्या दोघांमधली भांडणे कधी कधी विकोपाला जात आणि चारूताईंना मध्यस्थी करावी लागे. कारण भांडणाचा ताण असह्य झाला की, सावनी त्यांना फोन करत असे आणि रडत बसे. त्या घरी असल्या की, त्या तिला समजावू तरी शकत असत, पण ऑफिसात असताना त्यांची पंचाईत होई आणि त्यांनाही ताण येई. त्यांच्या त्रासाचे दुसरे कारण होते ते म्हणजे सावनीने त्यांना कायम सगळ्यासाठी दोषी ठरवले होते.

‘’तुम्हाला या त्रासाची कल्पना आहे ना? या किंवा कुठल्याही मानसिक आजारात बऱयाचदा त्या व्यक्तीला स्वतच्या भावभावनांवर आणि विचारांवर नियंत्रण नसतं,” असं सांगितल्यावर त्या पटकन म्हणाल्या ‘’हो मॅडम! मला डॉक्टरांनी पूर्ण कल्पना दिली होती. पण काय करू? शेवटी मीही माणूसच आहे आणि मलाही वेदना होतातच ना!” एवढं बोलून त्या रडायला लागल्या.

चारूताई या सावनीच्या आई आणि काळजी घेणाऱ्या एकमेव व्यक्ती होत्या. साहजिकच त्यांना जास्तीत जास्त जबाबदारीने वागावे लागत होते. त्यातच त्या त्यांच्या वृद्ध आईवडिलांचीही काळजी घेत होत्या. या सगळ्या ओझ्यांमुळे त्यांचे स्वतच्या मनाकडे दुर्लक्ष झाले होते.

हे बऱ्याचदा काळजी घेणाऱ्या व्यक्तींबाबत दिसून येते. दिवसाचे चोवीस तास या व्यक्तींना जागृत राहावं लागतं. कारण मानसिक रुग्ण किंवा व्यक्ती कधी कशा वागतील किंवा काय करतील याचा नेम नसतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मानसिक अत्यवस्थ व्यक्ती या बऱयाचदा औषधं आणि पथ्य पाळण्यात कुचराई करतात किंवा विसरतात. याबरोबरच त्यांना मानसिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठीही या व्यक्तींना त्यांना सतत प्रेरित करावे लागते. घरातील वातावरण प्रफुल्लित ठेवावे लागते.

अशासाठी या व्यक्तींना मानसिकदृष्टय़ा कणखर आणि तटस्थ असावं लागतं. पण असं पाहिलं गेलंय की, या व्यक्ती मानसिक पातळीवर डळमळू शकतात. याची कारणं बघायला गेली तर…

एकटय़ावर पडलेली / घेतलेली मानसिक अत्यवस्थ व्यक्तीची जबाबदारी.

घरातील इतर सदस्यांचा त्यांच्यावर असलेला अविश्वास.

स्वतच्या मनात चाललेलं द्वंद्व.

सामाजिक जीवनाकडे झालेले दुर्लक्ष.

‘मी टाइम’ची कमतरता.

चालू असलेल्या मानसिक उपचारांच्या परिणामांना लागत असलेला विलंब.

इतरही काही वैयक्तिक अडचणी (आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक).

चारूताईंच्या बाबतीत जवळपास ही कारणे लागू पडत होती. शिवाय त्याही स्वत रजोनिवृत्तीच्या उंबरठय़ावर होत्या. त्यामुळे त्यांची स्वतची अशी नाजूक परिस्थिती होती. त्यांना स्वतलाही गरज होती ती मानसिक आधाराची.
“माझ्या ऑफिसातील लोक म्हणतात की, सगळं ठीक होईल. तू टेन्शन नको घेऊस’ आणि बरेच सल्लेही मिळतात, पण या सल्ल्यांनी मला अजिबातच बरं वाटत नाही. त्यांना काय कळणार मी कुठल्या दिव्यातून जातेय ते!” चारूताई हताश आणि चिडलेल्या स्वरात म्हणाल्या. “बरोबर आहे. कोणालाही कळणार नाही तुम्ही आज काय हाताळताय. एकीकडे मुलगी, दुसरीकडे आईवडील, तिसरीकडे नोकरी आणि चौथ्या ठिकाणी तुम्ही स्वत” असं म्हटल्यावर त्यांना थोडेसे हायसे वाटले. “बरोबर आहे तुमचं. मला सल्ले नको आहेत. मला फक्त माझं मन मोकळं करण्यासाठी एक आश्वासक जागा पाहिजे. मलाही सांभाळून घेणारं कोणीतरी हवं आहे.” एवढं बोलून त्या शांत बसल्या.

पण ती त्यांच्या चेहऱयावरची शांतता ही कुठेतरी मनाला समाधान देऊन गेली आणि त्यांची वैयक्तिक सत्रे चालू झाली. ज्या सत्रांमध्ये त्या बरंच त्यांच्या गत आयुष्याबद्दल बोलल्या.

ज्यामध्ये मुख्यत त्यांना पतीबद्दल असणारी आस्था आणि नंतर त्यांचा झालेला घाव चारूताईंना बराच आतून जखमी करून गेला होता. त्या एका घटनेने त्यांचा आत्मविश्वास कमी झाला होता आणि त्यात सावनीची जबाबदारी त्यांना हळवं करून गेली. त्यांना त्या वेळी प्राप्त परिस्थिती कमकुवत करून गेली होती. मात्र कर्तव्यामुळे ते मनाचे घाव आतमध्ये रुतून बसले. ते सत्रांमध्ये कळले आणि मग चारूताईंच्या हळव्या दुखऱया मनाच्या कप्प्यावर काम सुरू झाले. बऱयाच दुःखद, वेदनादायक, अपमानाच्या आठवणी बाहेर पडल्या. समुपदेशनाच्या पद्धतींमुळे (विचारांची योग्य पद्धत, ताण आणि रागाचे व्यवस्थापन) त्यांना वैयक्तिक गुंत्यातून बाहेर पडायला मदत झाली तसेच सावनीसाठी आवश्यक असणाऱया मानसिक आधार बनण्यासाठीही त्यांना मार्गदर्शन केले गेले. शेवटी त्या सावनीच्या सर्वकाही होत्या. तिच्या जन्मदात्री, सखी आणि शिक्षकही होत्या. सावनीसाठी नऊ वेगवेगळ्या रूपांतील नवदुर्गांचं रूप त्या घेत होत्या आणि अशा या नवदुर्गेची काळजी घेणं गरजेचं होतं.