भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकाधिकारशाही, गुंडगिरी, दहशत मुळापासून संपवायची आहे. भोसरीतील भाजपचे लोकप्रतिनिधी नव्हे तर ताबा, मलिदा गँग असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत केला. तसेच आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात असून, आम्हाला धमक्या देऊ नका. आम्हीही राजकारणात गोट्या खेळायला आलो नसल्याचा इशारा पवार यांनी दिला.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आमदार पवार यांनी भोसरी मतदारसंघात प्रचार दौरा केला. कासारवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला उमेदवार गव्हाणे, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, सम्राट फुगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांची एकाधिकारशाही, महापालिकेतील विविध कामांत रिंग, भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असल्याचे सांगत आमदार पवार पुढे म्हणाले, ‘झेंडे, फलक काढले जातात. कार्यकर्त्यांना अडविले जाते. आमदारांनी चेंबरपासून ते विल्डिंगपर्यंत असा प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामातही ब्राँझच्या नावाखाली लोखंड वापरून पैसे खाल्ले आहेत. मतदारसंघात रेडझोन, वाहतूककोंडीसह विविध समस्या आहेत. औद्योगिक नगरीतील उद्योग गुजरातला पळविले जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे नागरिकांना परिवर्तन पाहिजे आहे. सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित अशा अजित गव्हाणे यांच्या पाठीशी जनता नक्कीच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेची साथ महत्त्वाची
भोसरी मतदारसंघामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवी लांडगे तसेच तमाम शिवसैनिकांची अजित गव्हाणे यांना साथ महत्त्वाची आहे. शिवसैनिकांच्या भक्कम साथीमुळेच गव्हाणे यांचा विजय निश्चित असल्याचेही आमदार पवार म्हणाले.
यूपी, गुजरात स्टाईल प्रचार महाराष्ट्रात चालत नाही
महाराष्ट्र ही संत-महापुरुषांची भूमी असून, त्यांच्या विचारांवर राज्य चालते. महाराष्ट्र धर्म आपल्याला जपायचा आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी जी काही वक्तव्य येत आहेत ती गुजरात, उत्तर प्रदेशवरून आलेली वाक्यं आहेत. अशा नेत्यांच्या सभेला महाराष्ट्रात गर्दीही होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात यूपी, गुजरात स्टाईल प्रचार चालत नसल्याचा टोलाही आमदार पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
धमक्या देऊ नका, आम्ही गोट्या खेळायला राजकारणात आलो नाही
20 नोव्हेंबरनंतर ‘माझ्या मूळ स्वभावावर मी येईल’, असे वक्तव्य भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी एका प्रचार सभेत केले. लांडगे यांच्या या वक्तव्याचा आमदार पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘तुम्ही स्वतःच्या तोंडून लोकांना सांगताय की, तुमचा मूळ स्वभाव काय आहे. हीच तुमची गुंडगिरी, दहशत आणि पैशांचा माज जनता २० तारखेला उतरविणार आहे. जे जकात नाक्यामध्ये पैसे खायचे ते आता जमिनीवर ताबा मारून, पालिकेत भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा लुटत आहे. पराभव समोर दिसत असल्याने आमदार लांडगे आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत. मात्र, आम्हाला धमक्या देऊ नका, आम्हीही राजकारणात गोट्या खेळायला आलो नसल्याचा’, इशारा पवार यांनी यावेळी दिला.