गेले 22 दिवस फरार असलेला आरोपी बिनधास्त व्हिडीओ व्हायरल करतो, पण तो पोलिसांना सापडत नाही हे आश्चर्यजनकच आहे. वाल्मीक कराडची शरणागती कसली, त्याला अटक व्हायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बीड आणि परभणीतील पीडित कुटुंबांना न्याय देण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे, असे त्या म्हणाल्या.
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही घटना महाराष्ट्राला लाजीरवाण्या आहेत असे सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या एसपींची बदली झाली, पण केवळ पोलिसांच्या बदल्या करण्यापेक्षा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कोणती ताकद वाचवतेय त्याच्या मुळाशी गेले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.