National Sports Awards – सचिन खिलारी, स्वप्निल कुसळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर चार जणांचा खेलरत्न पुरस्काराने गौरव

दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

Paris Olympics 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत दोन कांस्य पदके पटकावणाऱ्या मनू भाकरचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू डी गुकेश, पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणारा प्रवीण कुमार यांना राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याच सोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात हिंदुस्थानला तिसरे कांस्यपदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा सुपूत्र स्वप्निल कुसाळे आणि पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच हिंदुस्थानला पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून देणारे जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार : मनू भाकर (नेमबाज), डी. गुकेश (बुद्धिबळ), हरमनप्रीत सिंग (हॉकी), प्रवीण कुमार (पॅरा अ‍ॅथलिट).

अर्जुन पुरस्कार : ज्योती यराजी (अ‍ॅथलिट), अन्नू रानी (अ‍ॅथलिट), स्विटी (बॉक्सिंग), नीतू (बॉक्सिंग), सलीमा टेटे (हॉकी), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जरमणप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत सिंह (हॉकी), राकेश कुमार (पॅरा तिरंदाज), प्रीती पाल (पॅरा अ‍ॅथलिट), जीवनजी दीप्ती (पॅरा अ‍ॅथलिट), अजित सिंह  (पॅरा अ‍ॅथलिट), सचिन खिलारी (पॅरा अ‍ॅथलिट), धर्मवीर (पॅरा अ‍ॅथलिट), प्रणव सुरमा (पॅरा अ‍ॅथलिट), सिमरन जी (पॅरा अ‍ॅथलिट), नवदीप (पॅरा अ‍ॅथलिट), नितेश कुमार (पॅरा अ‍ॅथलिट), तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन), नित्या श्रु सुमती सिवान (पॅरा बॅडमिंटन), मनीष रामदास (पॅरा बॅडमिंटन), कपिल परमार (पॅरा ज्युदो), मोना अग्रवाल (पॅरा नेमबाज), रुबीना फ्रान्सिस (पॅरा नेमबाज), स्वप्नील कुसाळे (नेमबाज), सरबजीत सिंह (नेमबाज), अभय सिंह (स्क्वॅश), सजन प्रकाश (जलतरण), अमन (कुस्ती), सुचा सिंह-अ‍ॅथलिट (लाइफटाइम अर्जुन पुरस्कार),  मुरलीकांत पेटकर- पॅरा स्वीमिंग (लाइफटाइम अर्जुन पुरस्कार).

द्रोणाचार्य पुरस्कार : सुभाष राणा (पॅरा-नेमबाज), दीपाली देशपांडे (नेमबाज), संदीप सांगवान (हॉकी).