गेले वर्षभर आपल्या देदीप्यमान खेळाने हिंदुस्थानची मान अभिमानाने उंचावणार्या खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या धडाकेबाज क्रीडारत्नांचा राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन दोम्माराजू गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग, पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार यांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारा’ने तर महाराष्ट्राच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे, गोळाफेकपटू सचिन खिलारी यांचा अर्जुन तसेच पहिले सुवर्णविजेते पॅरालिम्पियन मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव आणि नेमबाज प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आज राष्ट्रपतींनी चार खेलरत्न आणि 32 अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला.
पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचा बोलबाला
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचाच बोलबाला होता. पॅरिस ऑलिम्पिक गाजवणाऱया नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राचा तब्बल 72 वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपविला होता. पॅरालिम्पिकमध्ये सचिन खिलारीने रौप्यपदकाची कमाई करीत 40 वर्षांत देशाला गोळाफेकीत पहिले पदक जिंकून दिले. या दोन्ही मराठमोळ्या ऑलिम्पियनचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदुस्थानला पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून देणारे जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी 50 मीटर प्रीस्टाईल प्रकारत हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडविला होता. तसेच पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याने महाराष्ट्राने पुरस्कार सोहळ्यात अनोखा चौकार लगावला.