महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आता प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटोगे तो कटोगे’ असे विधान करत काँग्रेसवर टीका केली होती. या त्यांच्या विधानाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. समाजात द्वेष पसरवत फूट पाडणारेही तुम्हीच आहात, तसेच फूट पडल्यावर स्वतःच्या स्वार्थासाठी कापणारेही तुम्हीच आहात, अशा शब्दांत खरगे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार केला. रांची येथील एका सभेत ते बोल होते.
योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधताना खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरही हल्लाबोल केला. वारंवार खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कसे मतदान करता? अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे झारखंडमध्ये दिलेले आश्वासन म्हणजे चुनावी जुमला आहेत. ते दोन कोटी युवकांना रोजगार देणार होते, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपे जमा करणार होते. यातील कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. हे सर्व जुमले होते. वारंवार खोटं बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवत तुम्ही त्यांना मतदान कसे करता, असा सवालही खरगे यांनी केला.
समजात द्वेष पसरवत फूट पाडणारे, फोडणारे आणि कापणारेही हेच आहेत. समजात फूट पाडणे हाच भाजप-आरएसएसचा अजेंडा आहे, जोपर्यंत त्यांचा अजेंडा मोडत नाही तोपर्यंत ते तुमचे शोषण करत राहतील. त्यामुळे त्यांचा अजेंडा मोडून काढण्याची गरज आहे. तसेच मोदी- शहा यांचे भाषण फक्त जुमला हे लक्षात घ्या. त्यांना समाजात फूट पाडत, भांडणे लावत, दंगली घडवत सत्ता मिळवायची आहे, असा हल्लाबोलही खरगे यांनी केला आहे.