संविधानावर 13-14 डिसेंबर रोजी होणार चर्चा; संसदेतील गदारोळ थांबण्याची शक्यता

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यावर एकमत झाले. त्यामुळे उद्यापासून संसदेचे कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. बैठकीत लोकसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू द्यावे आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सभापतींच्या या आवाहनाला सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवत सभागृहातील कोंडी दूर करण्याचे आश्वासन दिले.

ससंदेत संविधानावर 13-14 डिसेंबर रोजी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांची ही प्रमुख मागणी होती. त्यामुळे आता संसदेतील गदारोळ थांबण्याची शक्यता आहे. संसदेत सुरू असलेला गदारोळ रोखण्यासाठी सोमवारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला. मंगळवारपासून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरळीत चालेल, असा विश्वास संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यात सर्व पक्षांनी संसदेते कामकाज सुरळीत करण्याबाबत एकमत व्यक्त केले.

राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ऐतिहासिक चर्चा 13 आणि 14 डिसेंबरला होणार आहे. या चर्चेदरम्यान भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे, तिचा विकास आणि देशाच्या प्रगतीतील भूमिका यांचा विचार केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभागी होऊन आपले मत मांडू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

किरेन रिजिजू म्हणाले की, 13 आणि 14 डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर विशेष चर्चा होणार आहे, तर राज्यसभेत 16 आणि 17 डिसेंबरला ही चर्चा होणार आहे संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक विरोधी पक्षनेत्यांनीही मंगळवारपासून संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याबाबत सहमती दर्शवली आहे.