दहशत, भीती पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न; उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासणीवरून जयराम रमेश यांचा निशाणा

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे आता वातावरण चांगलेच तापले आहेत. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. आमच्या बॅगा तपासल्या तसेच मोदी-शहा, फडणवीस, मिंधे, अजित पवार यांच्या बॅगा तपासण्याचे धाडस दाखवणार का, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जनतेला घाबरवण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे, पैशांचा गैरवापर केला जात आहे. मात्र जनता आमच्यासोबत आहे. जनता आमच्यासोबत आहे, त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. आम्हाला सतर्क राहावे लागेल. हरियाणातील 20 जागांवर त्यांनी केलेला हेराफेरीसारखे प्रकार टाळण्यासाठी आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहावे लागेल.

सामजीक धुव्रीकरण हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे. समाजात द्वेष पसरवत, तेढ निर्माण करणे आणि स्वतःचा स्वार्थ साधणे, हेच भाजपचे एकमेव ध्येय असल्याचा हल्लोबलोही त्यांनी केला. जनता आमच्यासोबत असल्याने आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रा आणि झारखंडमध्ये काँग्रेस पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांनी उपस्थित केलेल्या जनतेशी संबंधित मुद्द्यांकडे जनतेचे लक्ष वळले आहे. त्यामुळे भाजपच्या खोट्या प्रचाराला आणि त्यांच्या द्वेष पसरवण्याच्या राजकारणाला जनता बळी पडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि झारखंडमधील काँग्रेस-जेएमएम युतीला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.