दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना लिफ्ट बंद पडली, महिला रुग्णाचा गुदमरून मृत्यू

दुसऱ्या वॉर्ड हलवत असताना लिफ्ट बंद पडल्याने महिलेचा रुग्णाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनाती परीडा असे मयत महिला रुग्णाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टमधील तांत्रिक बिघाडाबाबत चौकशी सुरु असल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ओडिसातील भद्रक जिल्हा रुग्णालयात गुरुवारी ही घटना घडली. नरसिंहपूर येथील रहिवासी असलेल्या 54 वर्षीय मिनाती परीडा या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे नातेवाईकांनी अ‍ॅम्बुलन्समधून तिला भद्रक जिल्हा रुग्णालयात नेले. प्रथमोपचार करुन डॉक्टरांनी महिलेला मेडिकल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले.

महिलेला लिफ्टमधून मेडिकल वॉर्डमध्ये शिफ्ट करत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि लिफ्ट बंद पडली. यामुळे महिला काही वेळ लिफ्टमध्ये अडकली. यामुळे गुदमरून तिचा लिफ्टमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.