संसदेत विरोधी पक्षनेत्याला का बोलू दिलं जात नाही? काँग्रेसच्या वेणूगोपाल यांचा लोकसभा अध्यक्षांना सवाल

लोकशाहीत संसदेत विरोधी पक्षनेत्याचे स्थान महत्त्वाचे आहे. सरकारची धोरणे, निर्णय यातील त्रुटी दाखवून त्यात सुधारणा सुचवणे, तसेच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेद्वारे सवाल उपस्थित करणे, संसदेत जनतेचा आवाज उठवण्याचे महत्त्वाचे काम विरोधी पक्षनेत्याकडे असते. असे असताना संसदेत विरोधी पक्षनेत्याला का बोलू दिले जात नाही, त्यांच्या काही सूचना आहेत, त्या त्यांना मांडायच्या आहेत, त्यासाठी परवानगी का देण्यात येत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे खासदार के.सी. वेणूगोपाल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केला.

याबाबत काँग्रेसने एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात वेणूगोपाल हा सवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विचारताना दिसत आहे. आता संसदेचे अधिवेशन सुरू आहे. संसदीय प्रक्रियेत अधिवेशाला महत्त्व आहे. पंतप्रधानांप्रमाणेच विरोधी पक्षनेत्याची अधिवेशनाच्या संसदीय प्रक्रियेत मोठी भूमिका असते, असे वेणूगोपाल यांनी सांगितले. तसेच नियम पुस्तिकेतील याबाबतचा नियम वाचून दाखवत त्यांनी लोकसभा अध्यक्षांचे त्याकडे लक्ष वेधले.

विरोधी पक्षनेता अल्पसंख्याकांचा, देशातील जनतेचा अधिकृत प्रवक्ता आहे. जनतेचे अधिकार, हक्क आणि जनतेच्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याकडे तो लक्ष ठेवतो. विरोधी पक्षनेत्याचे कार्य, पंतप्रधानाएवढे अवघड नसले तरी, त्यांना त्यांच्या भूमिकेसाठी अधिवेशनात महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची भूमिका संसदेत महत्त्वाची असते. अध्यक्ष महोदय, तुम्ही खासदारही होता, आपल्याला ही प्रक्रिया माहिती आहे. सुषमा स्वराज लोकसभा विरोधी पक्षनेत्या असताना, त्यावेळी लोकसभा अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली होती. हे आपल्याला माहिती असेल. ही आपल्या लोकशाहीची आणि संसदेची प्रथा आहे. आता, संपूर्ण विरोधी पक्ष चीनची घुसखोरी आणि सीमाभागातील परिस्थितीवर चर्चेची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेत्याला एक सूचना द्यायची आहे. मग, सर, त्यांना परवानगी देण्यापासून का रोखण्यात येत आहे?, असा सवाल वेणूगोपाल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केला आहे.