![Untitled design (18)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-18-696x447.jpg)
जम्मू-कश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी आयईडी स्पह्टात येथील सांबा जिह्यातील नाईक मुकेश सिंग (29) शहीद झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच शहीद जवानाच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. मुकेशने साडेनऊ वर्षांहून अधिक काळ सैन्यात सेवा केली. एप्रिल 2025 मध्ये त्याचे लग्न होणार होते. अखनूरला बदली होण्यापूर्वी तो ग्लेशियर, कश्मीर आणि पंजाबमध्ये तैनात होता. साखरपुडय़ासाठी दोन आठवडय़ांच्या रजेनंतर 28 जानेवारी रोजी तो कर्तव्यावर परतला होता, असे मुकेशचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी चगतर सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मुकेशचा लहान भाऊदेखील सैन्यात सेवा देत आहे. 20-21 एप्रिलला मुकेशचे लग्न होणार होते. मुकेश देशसेवेची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप लहान वयात सैन्यात भरती झाला. त्याच्या दोन्ही बहिणी विवाहित आहेत. मुकेशला बालपणापासून क्रिकेटची खूप आवड होती, असे त्याच्या मित्रमंडळीने सांगितले. दरम्यान, आयईडी स्पह्टात झारखंडच्या रांची येथील कॅप्टन करमजीत सिंग बक्षी यांनाही वीरमरण आले.