केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कश्मीरचे नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत. कश्मीरला ऋषी कश्यप यांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. कदाचित कश्यप यांच्या नावावरूनच या प्रदेशाचे कश्मीर असे नामकरण झाले असेल, असे अमित शहा म्हणाले.
‘जम्मू अॅण्ड कश्मीर अॅण्ड लडाख ः थ्रु द एजेस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून कश्मीरमध्येच हिंदुस्थानच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. सूफी, बौद्ध आणि शैल मठ सर्वांनी कश्मीरमध्ये चांगल्या पद्धतीने विकास केला आहे, असे शहा म्हणाले.
कलम 370 आणि ‘35 ए’च्या माध्यमातून देशाला एक होण्यापासून रोखण्याच्या तरतुदी होत्या. संविधानसभेत या कलमांना बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे ही कलमे तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर या कलंकित अध्यायाला मोदी सरकारने हटवले आणि विकासाचे रस्ते उघडले, असेही ते म्हणाले.
कलम 370 ने हिंदुस्थान आणि कश्मीरमधील एकोप्याला तोडले. त्यामुळेच कश्मीर खोऱ्यात दहशतवाद बोकाळला, परंतु आता कलम 370 हटवण्यात आल्यानंतर कश्मीरमधील दहशतवादी कारवाया घटल्या आहेत, असेही ते म्हणाले.