छोले भटुरेसाठी चणे शिजायला गॅसवर ठेवून झोपी गेले. चणे जळाल्याने घरात धूर पसरला आणि श्वास गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नोएडातील सेक्टर 70 येथील बसई गावात ही घटना घडली. उपेंद्र आणि शिवम अशी दोन तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
उपेंद्र आणि शिवम हे दोघे तरुण बसई गावात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचा छोले भटुरे आणि कुलचा विक्रीचा स्टॉल होता. शुक्रवारी रात्री गॅसवर चणे शिजायला ठेवून दोघेही झोपी गेले. काही वेळाने चणे शिजून जळून गेले. यामुळे घरात धूर पसरला.
दरवाजा बंद असल्याने घरातील ऑक्सिजनची पातळी खालावली आणि धुरामुळे कार्बन मोनोक्साईडचे प्रमाण वाढले. यामुळे श्वास गुदमरून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. घरातून धूर निघताना पाहून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता दोघे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.