छत्तीसगडमधील सुकमा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलाकडून नक्षलविरोधी शोध मोहीम सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुकमा डीआरजी, एसटीएफ आणि कोब्राच्या संयुक्त पोलिसांकडून ही मोहीम सुरू आहे. गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
छत्तीसगडमध्ये पोलिसांवर नक्षलवाद्यांनी आयडी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुकमा आणि विजापूरमध्ये शोध मोहीम सुरू आहे. विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले.
नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम सुरूच
पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर नक्षलवादी सुकमा परिसरात मोठी घटना घडवण्याची योजना आखत होते. गुप्तचर सुरक्षा संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि चकमक सुरू केली. जागरगुंडा भागात पोलीस दलाने दोन डझनहून अधिक नक्षलवाद्यांना घेरले आहे.