सिझेरियन प्रसुतीदरम्यान महिलेच्या पोटात सर्जिकल मॉप राहिला, कर्नाटकातील धक्कादायक प्रकार

सिझेरियन प्रसुतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटात सर्जिकल मॉप राहिल्याची घटना कर्नाटकातील पुत्तूर येथे उघडकीस आली आहे. महिलेचा पती गगनदीप सिंग याने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.

पीडित महिलेला 27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसुतीसाठी पुत्तूर सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. अनिल एस. यांनी महिलेची सिझेरियन प्रसुती केली. यानंतर 2 डिसेंबर 2024 रोजी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.

डिस्चार्जच्या एक आठवड्यानंतर महिलेला ताप आला. यानंतर महिलेला पुन्हा डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला गोळ्या दिल्या. त्यानंतरही तिच्या पोटातील वेदना थांबत नव्हत्या. यानंतर डॉक्टरांनी तिचे सीटीस्कॅन केले. त्यात महिलेच्या पोटात 10 सेमी गोळा दिसून आला.

डॉ. अनिल एस यांनी ही रक्ताची गुठळी असून ती काही काळात विरघळेल असे सांगितले. मात्र महिलेची प्रकृती बिघडत गेली. महिलेला सांधे, मनगट आणि पायात तीव्र वेदना होत होत्या. तिला चालणं, उभं रहायला जमत नव्हतं. महिलेला पुन्हा डॉ. अनिल यांच्याकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार देत ऑर्थोपेडिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला. यावेळी महिलेच्या पोटात सर्जिकल मॉप आढळून आला.

महिलेवर 25 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तोपर्यंत महिलेच्या फुफ्फुसात, रक्तात आणि इतर अवयवांमध्ये संसर्ग पसरला होता. 15 फेब्रुवारी रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर महिलेच्या पतीने डॉ. अनिल यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र त्यांनी भरपाई देण्यास नकार दिला.

आम्हाला प्रचंड मनस्ताप झाला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक तक्रार आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या पोर्टलवर याबाबत तक्रार दाखल केली आहे, असे गगनदीपने सांगितले. डॉक्टरांच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे सोशल मीडियावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.