जातीय हिंसाचारामुळे मणिपूरमधील लोक चिंताग्रस्त, न्यायमूर्ती बी.आर. गवई म्हणाले, त्यांना शांतता हवी आहे

जातीय हिंसाचारामुळे मणिपूर धगधगत असून तेथील लोक प्रचंड चिंताग्रस्त आहेत. त्यांना शांतता हवी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी म्हटले आहे. येथे प्रत्येकाला शांतता हवी आहे. सध्याची परिस्थिती कुणालाच नको आहे आहे, असेही ते म्हणाले. मणिपूर उच्च न्यायालयाच्या स्थापना दिवसानिमित्त ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठी मणिपूरचा दौरा करणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. कारण, याच भूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भारतीय राष्ट्रीय सेनेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढली होती. येथे 1944 मध्ये पहिल्यांदा हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज डौलात फडकला होता, असेही न्यायमूर्ती गवई म्हणाले. मणिपूरच्या मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या घरी परतायचे आहे. मला आशा आहे की, राज्यपालांच्या प्रयत्नांनी मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होईल आणि येथील परिस्थिती लवकरच सर्वसामान्य होईल, असेही गवई यावेळी म्हणाले.